चाफा !
हा वासाचा चाफा नाही बरं का..हा आहे मोठ्ठं चार पाकळ्यांचं फूल असलेला चाफा. एव्हाना या चाफ्याची आठवण सर्वाना फक्त गुढी पाडव्यालाच येते.
पण माझ्या खूप मौल्यवान लहानपणीच्या आठवणी या चाफ्याने जपलेल्या आहेत. आजीच्या आणि आमच्या घराच्या बरोबर मधल्या भागात एक पडकं घर होतं, रस्त्यापासून बऱ्याच उंचीवर होतं ते. त्या घराच्या समोर असं एक उंच चाफ्याचं झाडं कित्येक वर्ष उभं होतं. आजी आणि आई आणि माझी मोठी काकू अश्या तीन घरी गुढी उभारली जायची, आणि त्या गुढीला सजवायला आणि पुजायला चाफा हा हवाच. याची मक्तेदारी दिली जायची मी आणि माझ्या चुलत भावाकडे. इतर दिवशी जर आम्ही शाळा सुटल्यानंतर त्या पडक्या घराजवळ भटकायला गेलो तर उगाच एखादे काका जाता येता हटकायचे आम्हाला. पण ती आमची गुप्त जागा होती बऱ्याच गोष्टी करायला. उन्हाळाच्या सुट्टीत मातीची छोटी भांडी बनवून त्या झाडाखाली छोटी शेकोटी करून ती भाजल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. शेजारीच बाभळीचं एक खूप उंच झाड पण होतं, जिथं झाडाला खाच पाडून ठेवून नंतर आम्ही काडेपेटीच्या मोकळ्या डबीत डिंक गोळा करायचो, कधी शेजारच्या झाडीतून सुरवंट उचलून बरेच दिवस त्याला डबीत कोंडून ठेवून फुलपाखरू नाही झालं म्हणून नाराज व्हायचो. याच परिसरात रान वांग्यांची झुडुपं पण होती. एकदा आईला हि वांगी नेऊन दिल्याचं पण आठवतं. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी फुसके फटाके शेकोटीत दुरून फेकत बसण्यासाठी पण याच जागेची निवड केली जायची. तर अशी ही पडक्या घराच्या आसपासची जागा आमचा अड्डा होती. चाफ्याचं झाड म्हणजे आमचं खास. थंडी संपून थोडे दिवस गेले कि हे झाड फुलांनी भरू जायचं. मग आम्ही इथं जमून कुठं त्या फुलांच्या अंगठ्याचा कर, ससाच बनव असले उद्योग करायचो. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मात्र गल्लीतली सगळी आमच्यासारखी शाळकरी पोरं पोरी या झाडाखाली जमा व्हायची चाफ्याची फुलं तोडायला आणि गोळा करायला. झाड पूर्ण भरलेलं असायचं, बरीच फुलं खाली पडलेली असायची. शेजार पाजारच्या मुली उगाच खालची फुलं वेचायच्या आणि लवकर पळ काढायच्या. मुलं उगाच भाव मारायला वर वगैरे चढायची आणि फुलं पाडून द्यायची. आमचा तर अड्डा असल्यानं आम्हाला कुठून कसं चढायचं आणि फुलं कशी मिळवायची याची युक्ती माहित होती. आम्ही आपला सुमडीत भरपूर फुलं गोळा करायचो आणि आमच्या नेहमीच्या ठिकाणी गप्पा मारत अंधार पडायची वाट बघायचो. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी असायची आणि कळक धुवून पुसायचं काम वडील स्वतः करायचे. त्यामुळं घरी फुलं नेऊन पोचवली कि बहिणाबाई लगेच हाराच्या कामाला लागायच्या आणि मस्त चाफ्याचा हार तयार व्हायचा. आजीच्या घरी फुलं पोचवली की एखादा डिंकाचा लाडू हातात मिळायचा चरायला. तो चरत चरत दुसऱ्या दिवशीच्या सुट्टीचा बेत बनायचा गल्लीतल्या मित्रांबरोबर. सकाळी मस्त गुढी उभारून झाली, कि आम्ही रिकामे सगळ्यात मोठी गुढी शोधायला. बहुदा पहिला नंबर काकूच्या गुढीचा असायचा. मजा यायची गोड गोड नाश्ता करताना. पण काका ते कडूलिंबाचा पाला आणि गूळ खायला लावायचे प्रसाद म्हणून ते बिलकुल आवडायचा नाही मला. तिथं खाऊन मोहरीत जाऊन थुंकायचो बहुदा मी. आता ना ते झाड़ आहे ना आमचा अड्डा, पण माझ्या मनात मात्र चाफा नक्कीच आहे !

आज अचानक मी सहा वर्षा पूर्वी काढलेला चाफ्याच्या फुलाचा फोटो फेसबूक ने आठवण म्हणून दाखवला अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरेच दिवस लिहिलं नव्हतं, आज सगळंच जमून आलं. सण हे आपल्या आठवणी जपण्याचं आणि आठवणी निर्माण करण्याचं एक निमित्त आहे असं मला नेहमीच वाटतं. धर्म आणि संस्कृती यापलीकडे सणांचं बरंच महत्त्व आहे एवढं मात्र निश्चित.
गुढी पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी उगादी.
शकुन
१७ मार्च २०१८
१७ मार्च २०१८