Thursday, April 30, 2015

डाळकांदा



तुरीची डाळ गाळ शिजू न देता अलगद बाजूला करायची, फोडणी वर कांदा भाजून जरा तिखट आणि कोथिंबीर घालून वाफ आणली की झाला डाळ कांदा तयार! अत्यंत चविष्ट, झटपट आणि सोपी पाककृती. आमच्याकडे दर सोमवारी बनतो हा डाळकांदा, अगदी साधा, माझ्या पप्पांसारखा!

शाळेत असताना पासूनच  आठवत,  दर सोमवारच्या डब्यात डाळकांदा असायचा. मला खूप आवडायचा अशातलं  काही नाही पण काही मित्रांना खूप आवडायचा म्हणून मी पण खुश असायचो, त्यांच्या डब्यातलं पण ताव मारून खाता यायचं. दर सोमवारचं  हे मात्र ठरलेलं. नंतर शाळा संपली, डबा सुटला, डाळकांदा मात्र दर सोमवारी सकाळी ठरल्याप्रमाणे बनतच राहिला… नंतर कधी कॉलेजातून सुट्टीला घरी आलो कि डाळकांदा खायला मिळायचा, मग आवडायला लागला.

पण हा आमच्या घरी का बनवायचे दर सोमवारी सकाळी? माझ्या पप्पांचा आवडता आहे म्हणून. गेली कित्येक वर्ष पप्पा नोकरी निमित्ताने कोल्हापूर ला आहेत, निम-सरकारी नोकरी. आठवड्याला जाऊन येऊन करतात. सोमवारी सकाळी ७-८ वाजता निघालं की ऑफिस च्या वेळेत कोल्हापुरात दाखल. पाच दिवसाचा आठवडा आणि परत शुक्रवारी संध्याकाळी निघून सातारा! पप्पा दर सोमवारी डबा घेऊन जायचे, डाळकांदा आणि डाळ वांग त्यांच्या आवडीच. डब्यातून हेंडकाळू नये म्हणून डब्यात डाळकांद्याची निवड. हा सोमवारचा डबा पप्पा दुपारी व संध्याकाळी दोन वेळा खात. पैसे वाचवणे आणि बायकोच्या हातचं खाणे असे दोन्ही हेतू होते बहुतेक त्या मागे…

दर सोमवारी पप्पांना एस्टी स्थानकावर दुचाकीनं  सोडायला जावं लागायचं. आईला गाडी चालवता नव्हती येत तेव्हा. आईला गाडी शिकवायचे पप्पांचे बरेच प्रयत्न असफल ठरले.  आम्ही तीन भावंड लहान होतो तेव्हा कसे जायचे आठवत नाही पण आमच्याकडे बजाज ची एम ८० होती, दादा गाडी चालवायला लागल्यापसूनच आठवतं, तो जायचा सोडायला. मग तो शिकायला बाहेर गेला तेवा चुलत भाऊ जायचा एम ८० घेऊन, हिरो होंडा आल्यावर ती घेऊन. नंतर स्कुटी पेप आली, तेव्हा दीदी जायची सोडायला, मग मी पण गेलो मोठा झाल्यावर. गाड्या बदलल्या, सोडायला जाणारी माणसं बदलली तरी डब्यात मात्र ठरलेला मेनू … डाळकांदा! आई दर वेळी अगदी प्रेमाने डबा बनवून द्यायची. आई नोकरी करत होती तेव्हाचं  आठवत , काही वेळा डाळ रात्रीच शिजवायची आणि मग सकाळी उठून परतून डाळकांदा तय्यार, पप्पांच्या वेळेत!

अगदी गरिबीतून शिक्षण पूर्ण केलेले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं पप्पा शिवणकाम करता करता शिकले . आजी सांगायची, रात्री उशिरा पर्यंत शिवण करून सकाळी उठून अभ्यास करायचे परीक्षेच्या वेळेस. परिश्रमांचा चीज झालं, सरकारी नोकरी मिळाली, शिवणकाम चालूच होतं. माझी आई मात्र पप्पांची निवड, लहान पणापासून एकाच वाड्यात राहिलेले. लग्न झालं आणि आम्ही तिघे पण झालो समीर, स्नेहल आणि  मी शेंडफळ - शकुन. पप्पांची शकुनी गणपतीवर फार श्रद्धा. साताऱ्यात असले कि दररोजच जाण ठरलेलं. गणपतीला आवडणार गूळ खोब्र त्याचं पण फार आवडत. आजी सांगायची लहानपणी खोबऱ्याची वाटी पळवून पसार व्हायचे, आणि फस्त करायचे. माझे पप्पा पण शेंडफळ, पाच भावांच्या पाठचे. म्हणून चालत असेल कदाचित.

पप्पा अगदी शिस्तप्रिय. घरात अस्ताव्यस्त काही पडलेलं त्यांना आवडत नाही. शुक्रवारी संध्याकाळी आमच्या घरात उचला उचलीचा कार्यक्रम ठरलेला,जेणेकरून घर नीटनेटक दिसावं. तापट स्वभावाचे, जरा घाबरूनच असतो आम्ही त्यांना. पण आमच्या तिघांच्याही शिक्षण व इतर मागण्यांसाठी  पप्पानी कधीच हाईघाई केला नाही, हवं ते सगळं पुरवलं. सोमवारच्या संध्याकाळी पण घरचाच डबा खाल्ला त्यांनी.. गेली कित्येक वर्ष. 

दादाचं शिक्षण झालं, वहिनी आली, मी शिकायला बाहेरगावी गेलो, दीदी लग्न होऊन सासरी गेली, पप्पा आजोबाही झाले… तरी नोकरी मात्र कोल्हापूरलाच होती, सोमवार-शुक्रवार चं जाणंयेणं ठरलेलं. डब्यातही तेच  - आईने बनवलेला डाळकांदा.. वयाच्या पन्नाशी नंतर पण पप्पांचं  कोल्हापूर काही सुटलं नव्हतं. दादाने चार चाकी घेतली, तरी देखील पप्पांना सोडायला दुचाकीवरच जायचं कोणीतरी.

गेल्या २ वर्षापूर्वी कुठल्यातरी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन आईला पपांनी दाखल केलं. स्वतःची कामं चटकन करता यावीत म्हणून आई पण शेवटी दुचाकी चालवायला शिकली. मग आता तिचं अजून एक काम वाढलं, पप्पांना गाडीवर एस्टी स्थानकावर सोडायला  जायचं. तीही सगळं आवडीने करायची डाळकांदा आणि मग सोडायला जाणं. पप्पानाही ते आवडायच, कधी पासूनची त्यांची इच्छा पूर्ण झालेली, आईने गाडी चालवायची.

१६ एप्रिल ला पप्पांचा आणि दादाचा वाढदिवस झाला, त्याच दिवशी सुदैवाने दादा-वहिनीला दुसरी मुलगी झाली. पण हा पप्पांचा खास वाढदिवस होता, ५८वा !  ३० एप्रिल ला निवृत्ती, कोल्हापुरातला आणि नोकरीतला शेवटचा दिवस असणार...

काल सोमवार होता, खूप वर्षांचं गणित अजूनही तसच होतं… आई-पप्पा सकाळी लवकरच उठतात. पप्पा शकुनी गणपतीला जाऊन आले निघण्यापूर्वी. सोडायला येण्यापूर्वी स्वयंपाक करताना पप्पांनी आईला  सांगितलं, "आजचा डाळकांदा छान कर."   पप्पांना भरून आलं होतं, सोडून आल्यावर आईने फोन वर सागितलं.