Monday, September 21, 2015

गणेशोत्सव - माझा दृष्टीकोन







मी देव या संकल्पनेला मानतो वा नाही ही गोष्ट वेगळी, पण मी गणेशोत्सव तितक्याच उत्साहात दरवर्षी साजरा करतो. गणपतीची मूर्ती असणं वा नसण, छोटी असणं किंवा मोठी असणं हा मुळात प्रश्नच नसतो. प्रश्न असतो लहानपणापासून करत आलेल्या दहा दिवसाच्या आनंदोत्सवाचा, आपली संस्कृती जपण्याचा, त्याची पाळंमुळं शोधण्याचा आणि आठवणींना उजाळा देण्याचा. बोबड बोलत असल्यापासून म्हणत आणि ऐकत असलेल्या आरत्या पुन्हा एकदा दहा दिवस म्हणण्यात खरच मजा आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आपली पारंपारिक वाद्य वाजवून मिरवणुकीत नाचाण्यात मौज आहे वेगळीच ! बर्गर आणि पिझ्झाच्या देशात उकडीचे मोदक खाणं म्हणजे परमसूख आहे. 

टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांना एकत्र आणायला गणेशोत्सव सुरु केला, तो आम्ही इतर वेळी आपापल्या उद्योगात मग्न असणाऱ्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी चालू ठेवलाय एवढंच. धिक्चाक गाणी इतर वेळी ऐकणारे आम्ही गणेशोत्सवात का होईना दोन-चार भक्तीगीते ऐकतो, टी शर्ट आणि थ्रीफोर्थ घालणारे आम्ही एक दिवस कुर्ता पजामा घालतो, संस्कृत सारख्या भाषेतले श्लोक म्हणून ओठांचा आणि स्वरयंत्राचा व्यायाम करतो. अर्थ कळत नसला तरी, कुठंतरी मनाला शांती लाभते. मंद प्रकाशात संगणकावर काम करणारे आम्ही गणपतीशेजारी रोषणाई करतो, घरांमध्ये गणपतीची आरास पण मखर लावूननच करतो. आपली संस्कृती जपण्याचा एक अनोखं सूख मिळतं, आई वडिलांची शिकवण आचरणात आणल्याचा अभिमान वाटतो आणि एकटेपणाचा लवलेशही जाणवत नाही. 'गणपती बाप्पा ऽऽऽऽ 'मोलया च मोरया' होऊन पण खूप वर्ष झाली, तरीही ते आवडतं म्हणायला एवढंच ! _/\_