पूर्णविराम
पूर्णविराम आणि मी यांच्यात एक अतूट नातं आहे कदाचित, आम्ही एकमेकाला नेहमीच हुलकावणी देत राहतो. मार्शाच्या टाइपराईटर बरोबर आम्ही असच खेळत होतो तेव्हा त्यातला पूर्णविराम मला सगळ्यात जास्त आवडला, अगदी ठळक होता तो ! पण मला एक गोष्ट नेहमी वाटते, आपल्या आयुष्यातले पूर्णविराम एवढे ठळक असतात का कधी? की सुरू झालेलं सगळं फक्त शेवटच्या श्वासाने संपतं ? तोच खरा पूर्णविराम का?
आपल्याला एखाद्या गोष्टीत रस निर्माण होतो लहानपणापसून, खूप जवळचे मित्र मैत्रिणी बनतात , एखादी व्यक्ती आवडते, एखादं पुस्तक खूप आवडतं, एखादा विषय जिव्हाळ्याचा बनतो, आपला शेजार, आपलं घर, आपलं गाव, आपला देश या सगळ्यात आपण खूप गुंतून जातो, मनात कुठेतरी या सगळ्या गोष्टींची छाप निर्माण होते. पण त्यात कधी पूर्णविराम असतो का?
आपण जसजसे मोठे होतो तसं आपण व आपल्या सभोवतीचं सगळंच बदलत असतं, शाळेच्या मित्रांच्या जागी कॉलेज चे मित्र येतात, अजून कुठलं तरी पुस्तक आवडतं, आपण नवीन शहरं, नवीन देश, नवीन लोक यांच्यात मिसळून जातो. टाइपराईटर च्या जागी कॉम्प्युटर येतो, कॉम्प्युटर च्या जागी स्मार्ट फोन, मग टॅबलेट .. सगळ्यात पूर्णविराम असतो, पण ठळक नसतो बहुतेक.
आपल्या सगळ्यांची स्वप्न असतात, इच्छा असतात , जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात. हे सगळं काळानुसार आणि वेळेनुसार बदलत पण असतं. पण या सगळ्याला पूर्णविराम असतो का कधी ? एखादी आवडलेली गोष्ट, ते व्यसन का असेना थोड्या काळासाठी पुसट होते, धूसर होते, पण त्याची मनावरची छाप कधी कमी होत नाही . ज्या गोष्टींना पूर्ण विराम दिला असं वाटतं, त्या पुन्हा कधी कशा कुठे मनात उफाळून येतील कोणी सांगावं !
खरंच आपण कुठल्याही गोष्टीला मार्शाच्या टाइपराईटर सारखा पूर्णविराम देऊ शकतो का ? आपण पान बदलू शकतो वहीतलं, नवीन वही घेऊ शकतो पण आधीच्या पानावर काय लिहिलं होतं हे आपल्या एवढं घट्ट मनात बसलेलं असतं. कुठल्यातरी वळणावर आपण पुन्हा ते पान उलटण्याचा प्रयत्न करतो, ते वाचून खुद्कन हसणार असलो तरी किंवा त्यावरची अक्षरं अश्रूंनी मिटली असली तरी.
